20/07/2022
आरामाच्या जीवनातून स्वतःला बाहेर काढा
यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर प्रत्येक उद्योजकाने आपल्या जीवनात काही महत्वाचे बदल घडवून आणायला हवेत. पहिले तर तुम्ही व्यवसाय का करत आहात? याचे उत्तर तुम्हाला माहीत पाहिजे आणि माहित असेल तर ते कोणाच्या उपयोगाचे आहे हे अधिक महत्त्वाचे ठरते. आपला व्यवसाय हा जर आरामदायी असावा असे वाटत असेल किंवा व्यवसाय हा आरमदायी असेल तर तुम्ही व्यवसाय करत नसून नक्कीच स्वतः सोबत खेळ खेळत आहात. व्यवसाय का सुरू केला याला खूप महत्व असतो. अनेक उद्योजकांनी माझ्यासोबत त्यांच्या नवीन आयडिया किंवा नवीन सेटअप उभारताना माझ्याशी चर्चा केल्या, त्यात निदर्शनात काही गोष्टी आल्या त्यातील बऱ्याच लोकांनी काही पुढील प्रमाणे उत्तरे दिली. .
१. नोकरीचा कंटाळा आला म्हणून व्यवसायात स्वतःच काहीतरी करायचं.
२. विशिष्ठ व्यवसायात माझ्याकडे चांगले गुण आहेत म्हणून त्याबद्दल व्यवसाय करावा म्हणतो.
३. मी मोकळाच असतो, त्यामुळे हाताला काम म्हणून मला व्यवसाय चालू करायचा आहे.
४. व्यवसाय सुरू करून मला अधिक पैसे कमवायचे आहेत.
अशी काहीशी बरीच कारणे होती. तर नवीन आयडिया घेवून आलेल्या लोकांकडे कोणतेही ध्येय नव्हते. माझ्या निरीक्षणात हे आले की प्रत्येकजण हा व्यवसायाबाबत एकनिष्ठ नाही त्यांना स्वतःच्या आरामासाठी म्हणून व्यवसाय करायचं आहे. स्वतःच्या आरमासाठी जेव्हा आपण व्यवसाय करतो तेव्हा यशस्वी होणे अशक्य आहे. आपण कोणताही व्यवसाय करा त्यामागे एक विशिष्ठ ध्येय असायला हवे. ध्येय नसल्यामुळे आपण आपल्या व्यवसायाबाबत एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती निर्माण करून ठेवतो. मग व्यवसायात अनेक सेवा वाढविणे, किंमतीच्या स्पर्धा प्रतिस्पर्धा, नवनवीन व्यवसायात पदार्पण करणे, कोणीही कोणताही उद्देश दिला की त्याप्रमाणे वागणे इत्यादि. अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे व्यवसायाची पडझड होत असते. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे आपण व्यवसाय करण्यासाठी आरामदायी जीवनातून बाहेर पडायला हवे.
एक अकबर - बिरबलाची गोष्ट आहे, एकदा अकबर सर्व मंत्र्यांना प्रत्येकी एक मांजर आणि एक गाय देतो आणि सांगतो या मांजराला तुम्ही गाईचे दूध पाजा ज्याची मांजर गुबगुबीत होईल त्याला दोन महिन्यांनी बक्षीस दिले जाईल. सर्व जण आपल्या मांजराला गुबगुबीत करायचं ठरवतात आणि त्या मांजरांना खूप दूध पिऊ देतात... पण बिरबल या उलट करतो, गाईचे दूध मांजराला देत नसून स्वतः च्या उपयोगात आणतो. ठरलेल्या दिवशी सर्व मंत्री आपल्या मांजरांना दरबारात घेवून येतात, सर्वांच्या मांजरी एकापेक्षा एक भारी दिसतात. पण बिरबलाची सुकलेली मांजर पाहून सर्व हसायाला लागतात. अकबर बिरबलाला प्रश्न करतो अरे तू असे का केलेस? बिरबल एकही शब्द न बोलता त्याने पिशवीत आणलेले उंदीर काढतो आणि मांजरा समोर सोडतो. बाकी सर्व इत्तर मंत्र्याच्या मांजरी त्या उंदरांकडे फक्त बघत राहतात. पण बिरबलाची सुकलेली मांजर उंदराला धावत जावून पटकन पकडते. बिरबल त्यानंतर उदगारतो, ज्याचे काम त्याने नाही केले तर त्याचा या सृष्टीला काहीच फायदा नाही. जीवनात संघर्ष हा करावाच लागतो मग तो कोणीही असो, तुम्हाला प्रत्येक वळणावर संघर्ष आहे, त्यासाठी आरामदायी जीवनातून बाहेर पडा आणि आपण हाती घेतलेले काम निष्ठेने करा. हे ऐकल्यावर राजा खूप खुश होतो, आणि गुबगुबीत मांजरापेक्षा निष्ठेने स्वतःचे काम करणाऱ्या सुकलेल्या मांजराचा मालक विजयी घोषित केला जातो.
जीवनात संघर्ष आणि आपले काम निष्ठेने करत राहायचं. स्वतःला जर त्रास नाही ना दिला तर आपणही इत्तरासारखे बनतो. त्यामुळे एकतर कोणाच्या मदतीची अपेक्षा करायची नाही आणि कोणी मदत केली तर त्याचे आभार मानायचे. आणि कोणी मदत नाही केली तरी त्यांच्या बाबतीत देखील कृतघ्न राहायचं कारण ते देखील आपल्याला जगायला शिकण्याचा धडा देत असतात. याबद्दल छान चार ओळी आहेत.
वळून कोणी पाहिलं नाही
म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पट्ट्यानं बहरणं सोडलं नाही
या ओळी हे सांगून जातात, की संघर्ष हा कायम करावा लागतो. आपल्या जीवनाबद्दल आणि व्यवसायाबद्दल असेच असते. कोणी तुम्हाला साथ देऊदे अगर नको तुम्ही तुमचा कार्य निष्ठेने चालू ठेवा. याचा एक छोटा उदाहरण म्हणजे, माझ्या सवयी प्रमाणे आपला रोजचा quote पोस्ट करत असताना. काही लोकांनी आम्हाला पाठवू नका तर काहींनी इंग्रजी पेक्षा हिंदी मध्ये पाठवा सांगितले. मग त्यात बदल करून हिंदी अनुवाद खाली द्यायला सुरुवात केली. काही ग्रुप मध्ये पोस्ट करताना लोक thumb up करून प्रतिसाद देतात तर काही त्यावर दोन शब्द लिहून, काही रोज रोज का पाठवतो याला काय काम धंदे नाहीत म्हणून वेड्यात काढतात तर काही सर आम्हाला वैयक्तिक पाठवा म्हणून सांगतात. एका ग्रुप मधल्या सदस्याने विचारलं सर तुम्हाला तुमच्या लेखावर कोणी प्रतिसाद देत नाही आणि काही विशिष्ठ व्यक्तींनी पोस्ट केले की त्यावर छान छान असे म्हटले जाते किंवा काहीतरी प्रतिक्रिया दिली जाते, शिवाय तुमचे मित्र देखील त्या ग्रुप मध्ये असतील ना? तेही त्यावर काही बोलत नाहीत, तरी तुम्ही तिथे का ते पोस्ट करता? त्यावर मी त्याला म्हटल अरे त्याला अनेक कारणे असू शकतात. काय प्रतिक्रिया द्यायची हे सुचत नसेल, काही बोललो तर इत्तर कोणा विशिष्ठ व्यक्तीला राग आला तर याची भीती असेल, आपण त्याच्यापेक्षा अनुभवी व मोठे व्यक्तिमत्त्व आहोत अशी भावना असू शकते किंवा अर्ध्यापेक्षा लोक वाचत देखील नसतील अशी अनेक कारणे असू शकतात परंतु ज्या लोकांना आवडतं आणि जे आपल्याला मानतात ते आपल्याशी वैयक्तिक जोडले जातात. त्यासाठी गृपवरच त्यांनी प्रतिसाद द्यावा असे काही नाही. आपला कार्य आपण नित्य नियमाने चालू ठेवायचं. अर्थात आपण कोणावरही विसंबून न राहता कोण काय कितीही वाईट बोलले त्याकडे लक्ष न देता आपले चांगले कार्य सातत्याने सुरू ठेवायला हवे.
आणखीन एक पैलू म्हणजे डॅन ग्याबल या व्रेसलर चे म्हणणे आहे "Talent is everywhere, winning attitude is not." अर्थात प्रतिभा सर्वांकडे आहे, पण जिंकण्याची वृत्ती नाही. तुमच्याकडे ज्ञान कितीही असूद्या पण जर जिंकण्यासाठी तुम्ही स्वतःला आरामाच्या जीवनातून बाहेर काढून परिश्रम नाही घेतले तर यशाकडे वाटचाल होणे अवघड आहे. शेवटी एकच गोष्ट समोर येते ती म्हणजे आरामाच्या जीवनातून आपण स्वतःला बाहेर काढून कार्य करत राहायच आणि स्वतःला चांगली शिस्त लावून घ्यायला हवी.
लेखन
परेश पाटील
कवी / लेखक
ईमेल : [email protected]
मोबाइल : +91 8655559696
संकेतस्थळ : www.pareshpatil.com