04/06/2018
शेती हे सुद्धा करिअर आहे.
------------------------------------
दहावी किंवा बारावीचे निकाल लागले की, गुणवत्ता याद्या प्रसिद्ध व्हायला लागतात आणि गुणवान विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी पत्रकारांची घाई सुरू होते. या हुशार अभ्यासू मुलांना पत्रकारांकडून काही ठराविक प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये अभ्यास कसा केला? पेपर कसा सोडवला आणि पुढे काय करणार हे प्रश्न हमखास विचारले जात असतात. या हुशार मुलांकडून त्याची उत्तरे सुद्धा ठराविक पद्धतीनेच दिली जातात. यातली बहुतेक मुले डॉक्टर, इंजिनिअर होऊ इच्छित असतात. पत्रकारांनी असा प्रश्न विचारल्यावर आपण डॉक्टर होणार, आपण इंजिनिअर होणार अशी उत्तरे द्यावीत असे त्यांना पालकांनी सांगून ठेवलेले असतात आणि त्या मुलांच्या मनात सुद्धा डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे वेड त्यांच्या पालकांनी पेरलेले असते. खरे म्हणजे हा समाज केवळ डॉक्टर आणि इंजिनिअर यांच्यामुळे चाललेला नाही. हे या समाजातले दोन मोठे प्रतिष्ठित व्यवसाय आहेत ही गोष्ट खरीच आहे. परंतु समाजाच्या संचालनासाठी इतरही अनेक व्यवसायांची गरज आहे. निरनिराळ्या सरकारी खात्यातले प्रशासकीय अधिकारी, बँकांचे अधिकारी, पत्रकार, शेतकरी, व्यापारी, कारखानदार, शास्त्रज्ञ, पायलट इत्यादी अनेक व्यवसाय समाजामध्ये प्रतिष्ठेचेच आहेत. त्यांना पैसाही चांगला मिळतो, परंतु आपल्या देशामध्ये डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे वेड एवढे बळावले आहे की, या सगळ्या महत्वाच्या व्यवसायाकडे सर्वांचेच आणि त्यातल्या त्यात हुशार विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
या सगळ्या व्यवसायाकडे करिअर म्हणून पहायला कोणी तयार नाही. पण चांगला व्यापारी, चांगला कारखानदार, चांगला पत्रकार, चांगला शेतकरी हे सुद्धा करिअरचे विषय आहेत हे विसरता येत नाही. किंबहुना आणि डॉक्टर आणि इंजिनिअरपेक्षाही शेतकरी आणि उद्योजक हे जास्त महत्वाचे घटक आहेत. भारतातले लोक शेतीकडे केवळ उपेक्षेनेच पाहतात असे नाही तर शेतकरी होणे म्हणजे आयुष्याची बरबादी अशी लोकांची कल्पना आहे. तेव्हा लाखातच काय पण कोटीत एखादा विद्यार्थी सुद्धा आपण शेतकरी म्हणून करिअर करणार असे चुकून सुद्धा बोलत नाही. अशा प्रकारे ज्याकडे करिअर म्हणून बिलकुल पाहिले जात नाही असे एक क्षेत्र म्हणजे उद्योजकता. उद्योजक होणे हे करिअर आहे ही कल्पना जर कोणासमोर मांडली तर एक तर ती हास्यास्पद तरी वाटेल किंवा क्रांतिकारक तरी वाटेल. कित्येकांना उद्योजक म्हणजे काय हे माहीत सुद्धा नसते. त्यांच्यादृष्टीने उद्योजक म्हणजे दुकानदार.
#माझा_पेपर
#ऑनलाइन_अग्रॉ_मार्केटिंग