10/05/2026
*कोकण-एमएमआरमध्ये उष्णतेचा कहर; कर्जत ४२.६°C तर कल्याण डोंबिवलीचा पारा ४१.५°C वर*
कल्याण डोंबिवली | 8 मे :
मे महिन्याच्या सुरुवातीलाच कोकण आणि मुंबई महानगर प्रदेशात (MMR) उष्णतेने अक्षरशः कहर माजवला असून अनेक शहरांतील तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला आहे. हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत कोकण भागात ‘हीटवेव्ह’ अर्थात उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली असून येत्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, समुद्राकडून येणारे दमट वारे आणि वाढती आर्द्रता यामुळे प्रत्यक्ष जाणवणारे तापमान ५० ते ५५ अंश सेल्सिअसप्रमाणे जाणवू शकते,असा इशाराही मोडक यांनी दिला आहे.
शहरनिहाय आजचे तापमान
* कर्जत – ४२.६°C
* कल्याण – ४१.५°C
* डोंबिवली – ४१.३°
* बदलापूर – ४१.४°C
* नेरळ – ४२.४°C
* पळावा – ४२°C
* अंबरनाथ – ४१.८°C
* मोर्बे – ४१.७°C
* तळोजा – ४१.६°C
* चिपळूण – ४१.२°C
* मुंब्रा – ४०.९°C
* खारघर – ४०.८°C
* पनवेल – ४०.२°C
* मनोर – ४०°C
* दिघा – ३९.९°C
* कळवा – ३९.८°C
* कोपरखैरणे – ३९.४°C
* ऐरोली – ३९.३°C
* ठाणे – ३९°C
* नवी मुंबई विमानतळ – ३८.८°C
* मुलुंड – ३८.२°C
* कांजूरमार्ग व बेलापूर – ३८°C
* वाशी व नेरुळ – ३७.९°C
हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना व्यक्त केलेल्या अंदाजानुसार किनारपट्टी भागात तापमान ३८.५ अंशांच्या पुढे गेल्यास ‘हीटवेव्ह’सदृश परिस्थिती मानली जाते. तर घाट परिसरालगतच्या अंतर्गत भागात ४० अंशांवरील तापमान उष्णतेच्या लाटेचे संकेत मानले जातात. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, कर्जत, नेरळ आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
नागरिकांना सतर्कतेचा सल्ला...
* दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळा
* भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ घ्या
* लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या
* डोके झाकूनच बाहेर पडा
* उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून एसी, कूलर आणि पंख्यांच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. आगामी काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत.
News Credits:-