26/02/2014
MAHARSTRA TIMES NEWS वाट्टेल तेव्हा मोकळ्या मनानं पुण्याच्या रस्त्यांवर भटकणारे आपण, बारा वाजता झेड ब्रीजवर पोलिसांनी हटकलं तरी कुरकुरणारे आपण किती मोकळ्या मनानं जगतो, नाही का..? हे मोकळेपण जाणवतं जेव्हा जगण्यावर सतत कुणाचा तरी दबाव असलेल्यांशी आपला संवाद होतो... असाच संवाद पुण्याच्या युवकांनी साधला, कुणाशी तर नक्षलग्रस्त भाग असा शिक्का बसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या ५० गावांशी. तिथल्या प्रौढ, महिला आणि युवा मनांशी... शोधयात्रेनं संवादाचं पहिलं पाऊल टाकलं आहे.
काय होती शोधयात्रा
गडचिरोली हे नाव ऐकलं तरी अद्याप विकसीत न झालेला नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल जिल्हा डोळ्यासमोर येतो. माओवाद्यांच्या भीतीनं तिथं काम करणंही कसं काळ्या पाण्याची शिक्षा असतं, पांढरपेशा संवादात 'अमक्याला गडचिरोली दाखवला पाहिजे' असा उल्लेख एखाद्याला अद्दल घडवणं या अर्थानं सहज येऊन जातो. तिथंही माणसंच राहतात, त्यांनाही मन आहे, त्यांच्याही विविध समस्या आहेत, अपेक्षा आहेत हे सोयीस्करपणे विसरलं जातं. नेमका हाच धागा पकडून शोधयात्रेचं नियोजन करण्यात आलं होतं. गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची, धानोरा, भामरागड, एटापल्ली आणि आहेरी अशा पाच तालुक्यातल्या ५० गावांना तरुणांच्या या शोधयात्रेनं भेट दिली. जिथे रस्ता पोचलेला नाही तिथंही ही यात्रा गेली. या पाच तालुक्यांची नावं आपण बातम्यांमध्ये अनेकदा वाचली आणि पाहिली आहेत. शोधयात्रेनं सहभागी युवकांना अनेक गोष्टींचा उलगडा झाला.
काय साधलं यात्रेनं?
शोधयात्रेनं दहशतग्रस्त मनांशी संवाद साधला. विशेषतः आश्रमशाळांना भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांना नेमकं शिकावं कसं लागतं याची माहिती घेतली. महिला आणि युवकांशी संवाद साधला. माओवाद्यांनी पत्रकाद्वारे ही यात्रा करू नका, असं धमकावलंही होतं; पण ही यात्रा संवादाची होती. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी दबाव बाजूला ठेऊन शोधयात्रेचं स्वागत केलं. या यात्रेनं संवादाचा एक पूल उभं करण्याचं काम सुरु केलं आहे. या निमित्तानं एक सकारात्मक उपक्रम सुरू झाला आहे.
युवकांचं निरीक्षण
- निसर्गसंपन्न असूनही रस्ते आणि वीज या प्राथमिक सुविधांची वानवा - अनेक गावांत बसस्टॉप उभारण्यात आले आहेत; पण तिथं रस्ताच पोहोचलेला नाही. - विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परिस्थिती बिकट. शाळा आहेत. शिक्षक नाहीत. - माओवाद्यांना मिळणारा स्थानिकांचा पाठिंबा हा केवळ दहशतीमुळे आहे. - विकासासाठी प्रचंड निधी असूनही प्रत्यक्षात विकासकामे नाहीत.