08/01/2021
विकास पथावर बोरगाव बुद्रुक
बोरगाव बुद्रुक एकेकाळी राष्ट्रकूट घराण्याची राजधानी असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील लातूर-बार्शी या मुख्य रस्त्यावरील अवघ्या २७ किमी अंतरावर असणारे रस्त्याच्या दुतर्फा वसलेले गाव.
प्रामुख्याने व्यापारी शहर असणाऱ्या लातूरशी आपली नाळ जोडली गेल्यानं गावाचे अनेक व्यवहार लातूरवर अवलंबून आहेत. परंतु गावाने आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवत मागच्या ५ वर्षात केलेली कामे ही गावच्या लोकांना प्रगती पथावर नेणारी आणि गावाची नवीन ओळख निर्माण करणारी अशीच ठरली आहेत.
पाच वर्षांपूर्वी मुख्य रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गावात साधी पुरेशी लाईटची सोय नव्हती, पिण्याच्या पाण्याचे नळ तर सोडा पाणी पुरवठयाची सोय कोलमडलेली होती, गावचा मुख्य स्रोत असणारे शेतकरी योजनांपासून दूर तर मागास वस्त्या छपराविना ओस पडल्या होत्या.
पाच वर्षांपूर्वी गावचे सुपुत्र डॉ कैलास प्रभाकरराव काळे यांनी बोरगाव बुद्रुकच्या विकासाचा पाया रचला त्याला बोरगावच्या जनतेने खंबीर साथ दिली आणि आज डॉ कैलास काळे यांच्या कल्पनेतून बोरगाव बुद्रुकचा चेहरा मोहरा बदलला आहे.
पाच वर्षांपूर्वी अंधारात असणाऱ्या बोरगाव बुद्रुकने कात टाकली असून गावात बघेल तिकडे पथदिवे आणि हायमास्क सारख्या उंच टॉवरने चौक प्रकाशाने न्हाऊन निघाले आहेत. आज गावात ३३ केवी चे सबस्टेशन आहे. तर गावकऱ्यांसाठी सिंगल फेजच्या ३ डीपी बसवण्यात आले आहेत.
कोणत्याही देशाची प्रगती हि त्या देशाच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासावर अवलंबून असते आणि ग्रामीण भागाचा विकास गावातील संसाधने, शेती, रस्ते, शिक्षण, आरोग्य यावर अवलंबून असते हा धागा पकडत डॉ कैलास काळे यांनी गावातील लोकांना विश्वासात घेत गावाच्या हक्काचे पाण्याचे सोर्स मजबूत केले. पिण्याच्या पाण्याची नळाद्वारे घरपोच सोय व्हायला पाहिजे यासाठी गावातच विहीर घेतली. गावातील तलावाचे खोलीकरण केले. शिवाय ज्या भागात हे पाणी पोहचणार नाही, गावाच्या अश्या विविध भागात ५ बोअर घेऊन गावाच्या लोकांना नळाद्वारे घरपोच पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.