18/10/2025
१० ऑक्टोबर रोजी ठाणे-पालघर जिल्ह्यात हुतात्मा दिनी २५,०००ची प्रचंड जाहीर सभा, वाडा येथील नवीन पक्ष कार्यालयाचे उदघाटन
१० ऑक्टोबर हा हुतात्मा दिन आणि कॉ. गोदावरी शामराव परुळेकर यांचा स्मृतिदिन ठाणे-पालघर जिल्ह्यात दरवर्षी पाळला जातो. या वर्षी त्या दिवशी वाडा तालुक्यातील हायटेक मैदानात २५,००० श्रमिक स्त्री-पुरुषांची प्रचंड जाहीर सभा घेण्यात आली.
सभेपूर्वी पक्षाच्या जिल्हा कमिटीच्या वाडा येथे नव्याने बांधलेल्या ‘कॉम्रेड बारक्या मांगात भवन’ या तीन मजली कार्यालयाचे उदघाटन पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
उदघाटन समारंभ आणि जाहीर सभेला तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, पालघर, शहापूर, वसई, भिवंडी, ठाणे शहरी आणि अर्थात वाडा या ११ तालुक्यांतील हजारो लोक आले होते. माकपच्या जोडीला किसान सभा, सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच या सर्व संघटनांनी आपली ताकद या सभेसाठी लावली होती. २० हजार पत्रके जिल्हा कमिटीने काढून ती गावोगाव वाटण्यात आली होती.
कॉ. बारक्या मांगात हे माकपचे राज्य सचिवमंडळ सदस्य होते, आणि २०१४ ते २०२२ या अत्यंत कठीण पण पक्षासाठी अखेर विजयी ठरलेल्या काळात ते पक्षाचे जिल्हा सचिव होते. ते किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष होते आणि डीवायएफआय चे जिल्ह्यातील संस्थापक-अध्यक्ष होते. तलासरी व डहाणू तालुक्यात अनेक चांगल्या शिक्षणसंस्था चालविणाऱ्या आदिवासी प्रगती मंडळाचे ते सचिव होते. यावेळी कॉम्रेड मांगात यांचे कुटुंबिय मुलगा हरेश, सून प्रीती आणि कन्या देवलू देखील आवर्जून उपस्थित होते आणि त्यांना या प्रसंगी आपले अश्रू अनावर झाले. शांत, संयमी, सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या पण त्याचबरोबर पक्षाच्या हिताशी तसूभरही कधीच तडजोड न करणाऱ्या कॉम्रेड बारक्या मांगात यांच्या नावाच्या घोषणा होताच सर्वांचेच डोळे पाणावले.
तळपत्या उन्हात झालेल्या या अत्यंत उत्साहजनक कार्यक्रमात आणि नंतरच्या जाहीर सभेस डॉ. अशोक ढवळे यांच्या व्यतिरिक्त पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या मरियम ढवळे, राज्य सचिव व केंद्रीय कमिटी सदस्य डॉ. अजित नवले, केंद्रीय कमिटी सदस्य आमदार विनोद निकोले, माजी राज्य सचिवमंडळ सदस्य किसन गुजर, जिल्हा सचिव व राज्य सचिवमंडळ सदस्य किरण गहला, राज्य सचिवमंडळ सदस्य प्राची हातिवलेकर, वाडा तालुका सचिव व राज्य कमिटी सदस्य चंदू धांगडा, राज्य कमिटी सदस्य लहानी दौडा, वाड्याचे प्रमुख कार्यकर्ते प्रकाश चौधरी यांनी संबोधित केले. राज्य कमिटी सदस्य रडका कलांगडा, भरत वळंबा, सुनीता शिंगडा, किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत घोरखाना, डीवायएफआय चे राज्य अध्यक्ष नंदू हाडळ, राज्य सहसचिव राजेश दळवी, एसएफआय चे राज्य उपाध्यक्ष भास्कर म्हसे व पक्षाचे इतर सर्व जिल्हा कमिटी सदस्य सभाममंचावर होते.
सर्व वक्त्यांनी वाडा तालुक्याने अत्यंत मेहनतीने आणि जिद्दीने बांधलेल्या या कार्यालयाची प्रशंसा करताना आणि त्यात मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानत असताना, येणाऱ्या काळातील राजकीय आव्हाने, भाजपच्या केंद्र व राज्य सरकारची दिवाळखोर, धर्मांध व हुकूमशाही धोरणे, आणि आपल्यासमोरील कार्ये या विषयांवर मार्मिक भाष्य केले.
येत्या १-३ नोव्हेंबरला डहाणूत होणाऱ्या जनवादी महिला संघटनेच्या राज्य अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीची जाहीर सभा हजारो महिलांच्या उपस्थितीत यशस्वी करणे, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक यश मिळविण्यासाठी झटणे, याचे बुलंद आवाहन करण्यात आले. जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात वसलेले वाड्याचे हे नवीन कार्यालय येत्या सर्व लढ्यांचे एक प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वासही सर्वांनी व्यक्त केला.
या जाहीर सभेत १५,००० रुपयांच्या पुरोगामी साहित्याची आणि ‘जीवनमार्ग’ची विक्री झाली.
CPIM Maharashtra - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र All India Kisan Sabha Communist Party of India Communist Party of India (Marxist) Vinod Nikole विनोद निकोले