30/06/2024
औंध पुणे येथील "श्री स्वामीसमर्थ औंध" पुरस्स्कार 2024, या सोहळ्याच्या निमित्ताने 4 मार्च 2024 रोजी आदरणीय स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज, कोषाध्यक्ष श्रीराम मंदिर अयोध्या, यांनी विश्वधर्मी डॉ प्रा. विश्वनाथ कराड संस्थापक एमआयटी यांना पुरस्कार प्रदान करतांना केलेल्या भाषणावरून संकलित,
वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छान्दसामपि |
मंगलानां च कर्तारौ वंदे वाणीविनयकौ ||
नमामि सद्गुरुं शांतं सचिदानंद विग्रहं |
पूर्णब्रह्म पारानंदम इर्षमालंदी वल्लभम ||
प्रपन्नं पारीजाताय तोत्त्र-वेत्रैक-पाणये ।
ज्ञान-मुद्राय कृष्णाय, गीतामृत-दुहे नमः ।।
माधुर्य सकल्लोळांम शिवशक्तयेक रुपिणीम |
अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम ||
यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनु |
यस्य ब्रह्ममयी दृष्टी सद्गुरू पातुमाम सदा ||
आपदामपहर्तारं दातारं सर्व संपदाम |
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं ||
आपल्या स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव आहे. आजादीका अमृत काल. येणारी पंचवीस वर्ष, म्हणजे जेव्हा आपल्या स्वातंत्र्यला शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा पर्यंत हा अमृतकाळ हा या देशाच्या उत्थापनाचा काल आहे. आणि अशा प्रकारच्या उत्थापनाची जी काही अनेक ठिकाणी मला प्रतीक आढळतात, ज्या खाणाखुणा दिसतात, त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट ही आहे की सगळीकड़े आपल्या संतांच्या बद्दलचा आदर वाढत चाललेला आहे. स्वामी समर्थांच्या नावाने आपण हे कार्य आरंभ केलं. स्वामी समर्थ या भूतलावरती अवतरले आणि खरोखरी महाराष्ट्र भूमी धान्य आहे. एकटे स्वामी समर्थ नाही तर इकडे श्री स्वामी समर्थ आहेत. तिकडे श्री गजानन महाराज आहेत. तिकडे श्री साईबाबा आहेत. संत श्री गुलाबराव महाराज आहेत. पूज्य श्री टेम्बेस्वामी महाराज आहेत. अशा प्रकारची नक्षत्र या भूतलावरती त्याकाळामध्ये चमकून गेली. त्यांनी खरोखर या देशाचे भवितव्य उज्वल होण्याकरता सर्वात मोठी कृपा आपल्यावरती वर्षवली. "तस्मादातन्यम्ब वर्षे भूती कामहा". वेदांनी सांगितलं की ज्याला वैभवाची इच्छा असेल त्यानं आत्मज्ञान संपन्न सत्पुरुषांची सेवा करावी त्यांची आराधना करावी. खरं म्हणजे अशा प्रकारची ही आराधना भगवंताची आराधना भगवंतांच्या सोबतच भगवंतांची भक्ती करणाऱ्या या संतांची ही खरोखर संजीवनी आहे ज्यानं हे देश इतक्या मोठ्या अत्यंत भयंकर अशा कालखंडातही पुन्हा उठून उभा राहिला. आणि नुसता उठून उभा राहिला नाहीये तर, आता हा देश झेपण्याकरता, झेप घेण्याकरता सिद्ध झालेला आहे. स्वामी विवेकानंदांनी जे भविष्य वर्तविलें ते भविष्य अध्यत्माच्या बळावरती वर्तविलें. आध्यत्म हा देशाचा प्राण आहे. आणि म्हणून तर जगात अट्ठेचाळीस संस्कृतींच्या पैकी सत्तेचाळीस संस्कृती नष्ट होऊन गेल्या. पण एकमात्र उरलेली संस्कृती जी आहे ती भारतीय संस्कृती आहे. ज्या ज्या ठिकाणी आक्रमण झाली ती ती संस्कृती नेस्तनाबूत झाली. पुन्हा त्या ठिकाणचे एखादे ग्रंथालय किंवा त्या ठिकाणचे प्रार्थना स्थळ पुन्हा उभं राहू शकले नाही. पण पाच शतकांच्या संघर्षा नंतर सुद्धा पुन्हा रामाचे मंदिर उभं राहिलं याचं कारण हे संस्कृती ही मृत्युंजय संस्कृती आहे. आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा आपण स्वामीसमर्थांच्या नावे जे कार्य करता आहात हे ज्याला सुचलं, आणि जे त्यामध्ये सहभागी झाले, जे त्याला हातभार लावताहेत, अन जे त्या कार्याची सेवा करतात, त्या आपल्या सर्वांचे मनोभावे मी अभिनंदन करतो.
आणि या कार्याच्या अंतर्गत उपासना करता करता काही सत्पुरुषांचे अभिनंदन आपण करावं, त्यांना पुरस्कार द्यावा, आणि त्यांच्या बद्दलची आपली सामाजिक कर्तव्यता व्यक्त करावी हा जो आपण उपक्रम आखला आहे; हा उपक्रम या संपूर्ण कार्याशी सुसंगत, न्हवे न्हवे तर पुढल्या पिढीला अत्यंत मोठी प्रेरणा देणारा उपक्रम आहे. त्या साठी आपण या वेळेला जे व्यक्तिमहत्व निवडलं, ते व्यक्तिमहत्व असे आहे की आज जितके लोक त्याची नोंद घेताहेत, त्या पेक्षा असंख्य पटीने येणाऱ्या काळात लोक त्याची नोंद घेणार आहेत; की अशा ही प्रकारचा एक विश्वनाथ या पुण्यामध्ये चालता बोलता हिंडून गेला, राहून गेला.
पुण्यातल्या शिक्षण क्षेत्रांतल्या शिक्षणसंस्था कमी नाहीयेत. शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे याबद्दल शंकाच नाहीये, आणि त्यामुळे ज्ञानाला पर्याय नाही, "ज्ञानाइतके श्रेष्ठ अन्य काही नाही" असे भगवंताने सुद्धां म्हणलेले आहे. पण भगवंताला जे ज्ञान अपेक्षित आहे ते ज्ञान आत्ताच्या शिक्षण संस्था निर्माण करणाऱ्या लोकांना अभिप्रेत न्हवतं. त्या सर्वांना हे 'इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज' हे अभिप्रेत होतं. म्हणजे ज्यातून बाहेरच्या सुविधा जेव्हा प्राप्त होतील, पुष्कळ माहिती गोळा होईल आणि त्यातनं कमावण्याची विद्या शिकता येईल. अशा प्रकारच्या ज्ञानाची विद्यालय आणि महाविद्यालय निर्माण झाली,. पण माणूस बनवणारं महाविद्यालय निर्माण करणारे आमचे विश्वधर्मी श्री विश्वनाथजी कराड आहेत.
आज आवश्यकता कशाची आहे? एकीकडे या बाहेरच्या सगळ्या स्कीलची पण आवश्यकता आहे. त्या विज्ञानाच्या अभ्यासा खेरीज समृद्धी नाही आणता येणार. विज्ञान या जागतिक शक्तींचे ज्ञान आहे. आणि या जागतिक शक्तींचा, या विश्वातल्या या बाह्य शक्तींचा उपयोग कशाप्रकारे आपल्या विकासाकरता करून घ्यावा हे विज्ञान आपल्याला शिकवतं. त्याची आवश्यकता तर आहेच आहे. पण त्याचा उपयोग करून एखादा डॉक्टर झाला, एखादा उत्तम वकील झाला, एखादा चांगला चार्टर्ड अकाउंटंट झाला, एखादा आणखी काहीतरी झाला, आणि काहीच गुणसंपदा नसेल तर एखादा नेता होऊन गेला. असा जो कोणी जे काही होईल ते त्यांनी व्हावं हे आवश्यक पण आहे. या सर्व क्षेत्रांची आवश्यकता देशाला आहे. पण देशाला त्याहीपेक्षा सर्वात अधिक आवश्यकता आहे; तो डॉक्टर असो, किंवा तो वकील असो, किंवा तो इंजिनिअर असो, किंवा तो राजनैतिक नेता असो, त्याने पहिल्यांदा 'माणूस' बनले पाहिजे. याची सर्वात जास्त आवश्यकता आहे.
'मनूर्भव' हा वेदांचा मंत्र आहे. पहिल्यांदा माणूस हो...! माणूस हो. माणुसकीरहीत शिक्षण जर असेल, माणुसकीरहीत जर स्किल असेल तर ते लोकांच्या सुखाला कारण होत नाही. ते लोकांच्या क्लेशाला कारण होतं. आणि हे सिद्ध होण्या करता फार दूर जाण्याची आवश्यकता नाहीये. या करोनाच्या काळांत आम्हाला डॉक्टरांच्या मधले देव कसे असतात याचे दर्शन घडवलं. आणि याच करोनाच्या काळामध्ये डॉक्टरांच्या मधले राक्षस कसे असतात त्याचेही दर्शन घडवलं. दोन्ही गोष्टी आहेत. या सगळ्यांची उदाहरण मी देईन. पण, हे अंतर का निर्माण झालं ? हे अंतर येव्हढ्यामुळे निर्माण झालं की त्यांना असं वाटलं की, नाही... आपला जीव धोक्यात घालून सुद्धा मी पेशंटची सेवा केली पाहिजे. लोकांना वाचवण्या करता प्रयत्न केला पाहिजे. आणि लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करता करता डॉक्टर गेले. ते काय धोका पत्करताहेत याची त्यांना जाणीव होती. पण त्यांना एका गोष्टीची अधिक जाणीव होती ती म्हणजे 'स्वतःसाठी जगलास तरी मेलास' आणि 'इतरांच्या करता मेलास तरी जगलास'.
'जे जे भेटते भूत ते ते म्हणिजे भगवंत | हा भक्तियोग निश्चित जण माझा ||' माझ्या समोर आलेल्याच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामधल्या त्या परमेश्वराला मी बघावं आणि त्याची सेवा करावी. नारायण असे विश्वी. समर्थ म्हणतात 'नारायण असे विश्वी | त्याची सेवा करीत रहावी ||'. पण हा संस्कार भक्तीशिवाय येत नाही. आणि ही खरीखुरी भक्ती ज्ञानोबा तुकारामांशिवाय येत नाही. आणि त्या ज्ञानोबा तुकारामांना महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात स्थापन करणारे आमचे डॉक्टर विश्ववनाथजी कराड हे अत्यंत थोर आहेत. त्यांची पुढली ओळख ही आहे.
विकास तो चाहिये, लेकिन विकास के साथ साथ विरासत की रक्षा भी होनी चाहिये. शास्त्र पाहिजे पण शास्त्रज्ञ सोबत संस्कृती पण जगली पाहिजे. आणि संस्कृती कशी जगावी याचं स्वच्छ दर्शन एमआयटी मध्ये गेलं की कोणालाही व्हायला हरकत नाही. अध्यत्मामध्ये विश्वास शिक्षण संस्था चालवणाऱ्याचा नसतो असे मला सांगायचे नाहीये. त्यांचा असतो. पण तो त्यांनी आपल्या देवघरापुरता ठेवला. आपल्या घरा पुरता ठेवला. म्हणजे, मला काही वर्षापूर्वीची काही मंडळी आठवतात. शिकली सवरलेली. मंदिरा समोरून जाताना देवाची उपेक्षा करता येत नाही. म्हणून नमस्कार करावासा वाटतो. पण आपण नमस्कार करण्याइतके बुरसटलेले आहोत हे लोकांच्या लक्षात येऊ नये असा नमस्कार करतात. म्हणजे आपल्या नमस्काराबद्दल सुद्धा आपल्याला आत्मविश्वास नाही, अशा प्रकारची स्थिती होती. पण त्यामुळे शिक्षण संस्था निर्माण करणाऱ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये अध्यात्मिकता न्हवती असे मला म्हणायचे नाहीये. पण ती अध्यत्मिकता प्रकट करण्याचे साहस न्हवतं. ते साहस दाखवणारा एक सिंह या पुण्याने पाहिला, तो सिंह म्हणजे श्री विश्वनाथ कराड आहे.
म्हणून अशा एका व्यक्तीचे आपण जे आज अत्यंत कृतद्न्यतेनं पूजन केलं, ते पूजन करण्या करता मला साधन बनवलं, त्याचा माध्यम मी बनलो याचा मला अत्यंत मोठा आनंद आहे. कारण हे माझी अत्यंत प्रिय गोष्ट आहे. ज्या ज्या ठिकाणी श्रेष्ठता असेल, ज्या ज्या ठिकाणी अत्यंत मोठं कार्य आपल्याला दिसत असेल, त्या त्या लोकांचा आपण आदर करायला शिकले पाहिजे.
आता उल्लेख झाला, माझा अमृत महोत्सव वगैरे वगैरे होता. आता लोकांना वाटते की मला पंच्याहत्तर वर्षे झाली! मला अजून काही जाणवत नाही आणि वाटत नाही. पण लोक म्हणतात म्हणून मी ऐकून घेतो. पण हा घाट घातला गेला की काही उत्सव वगैरे केला पाहिजे. मी म्हटलं "हे बघा उत्सव करायचा असेल तर पहिली गोष्ट, मला दोन गोष्टी हव्यात, बाकीचे काय तुम्हला बघायचे ते बघा! मला एक श्रीमतभागवत ऐकायचे आहे. कारण भागवता वरचा ग्रंथ मला ठाऊक नाही. भागवत ही सगळ्या भक्तिशास्त्राची गंगोत्री आहे. म्हणून मला भागवत आळंदीत बसून ऐकायचा आहे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, पंच्याहात्तर अशा लोकांचा सत्कार मला करायचा आहे ज्यांनी आपलं उभं आयुष्य समाजाची सेवा करण्यामध्ये घालवलं. आणि जे प्रसिद्धी पासून पराङमुख राहिले. प्रसिद्धी पराङमुख राहून ज्यांनी समाज सेवा केली अशा लोकांचे मला पूजन करायचे आहे." ही सामाजिक कृतद्न्यता आहे. केंव्हातरी आपला सत्कार केला जाईल म्हणून त्यांनी ही समाजसेवा केलेली नाहीये. पण म्हणून समाजाने त्यांच्या कडे लक्ष देऊ नये असे पण नाहीये.
भर्तृहरीने फार चांगल्या शब्दात म्हणलं 'अरे रत्नांना कुठे ही ठेवलं तरी रत्न आपले तेज पसरवीत राहतात'. त्यांना त्याची पर्वा नसते की मला कोंदणात ठेवलंय की मला अन्य कुठे ठेवलंय. पण रत्नांना कुठे ठेवावं आणि रत्नांना केव्हा लोकांच्या समोर आणावं हे आपल्याला कळलं नाही तर त्यावरून आपली परीक्षा होऊन जाते, कीआपल्याला पारख न्हवती. तुम्हाला पारख आहे. तुम्ही एका रत्नाची या इथे आणून अत्यंत कृतद्न्यता भावाने पूजा बांधली. यामध्ये सहभागी होण्यात मला फार आनंद आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा उपक्रम जो पुढल्या पिढ्यांना निश्चित पणे प्रेरक राहील. तो सातत्यानं आपल्याकडनं भगवान स्वामी समर्थ करून घेत राहोत. आणि त्याच्या करता आवश्यक ते सगळं बळ आपणाला त्यांच्या कृपेने प्राप्त होत राहो. अशा प्रकारची त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. भारत माता की जय.