Livesolapur News

Livesolapur News livesolapur news

23/05/2026

सोलापूर शहरात पावसाची हजेरी; उकड्यापासून दिलासा Livesolapur News ABP Majha BBC News Marathi Mumbai Tak Saam TV News TV9 Marathi Zee Marathi Saamana Online fans

आमदार विजय देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार थकीत निर्वाह भत्ता...सोलापूरातील विद्यार्...
22/05/2026

आमदार विजय देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार थकीत निर्वाह भत्ता...

सोलापूरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; वसतिगृह प्रवेशालाही शासनाची मान्यता

सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश अधिकृत करण्यास तसेच विद्यार्थ्यांना मागील कालावधीतील निर्वाह व भोजन भत्ता देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळूनही निर्वाह भत्ता मिळत नव्हता. विशेषतः सन २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय अडचणींमुळे लाभांपासून वंचित राहावे लागत होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर आमदार विजय देशमुख यांनी इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री तसेच संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी मंत्रालयात पत्र देऊन विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या.

२२ एप्रिल २०२६ रोजी मंत्रालयातून यासंदर्भात आदेश काढण्यात आले. त्यानंतर ७ मे २०२६ रोजी पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाने संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवत विद्यार्थ्यांच्या प्रवेशास मान्यता देण्याबरोबरच भोजन व निर्वाह भत्ता अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

शासनाच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.

“विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहणार” — विजय देशमुख

याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार विजय देशमुख यांनी सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबता कामा नये. विद्यार्थ्यांना त्यांचे हक्काचे लाभ मिळवून देण्यासाठी आपण पुढेही प्रयत्नशील राहणार आहोत.

अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना...महापौर विनायक कोंड्याल ...
22/05/2026

अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रशासनाला सूचना...

महापौर विनायक कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती : नागरिकांना सुविधा पुरविण्याबाबत पाठपुरावा...

सोलापूर : प्रतिनिधी

शहरातील अक्कलकोट रस्त्यावरील अर्बन स्ट्रीट पार्कच्या सुशोभीकरण आणि सुरक्षेबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांच्या समवेत पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या. महापालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा नियमितपणे मिळाव्यात याकरिता आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल पाठपुरावा करत आहेत.

शहरातील विशेषतः अक्कलकोट रस्त्यावरील नागरिकांच्या सोयीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देऊन अर्बन स्ट्रीट पार्क विकसित करण्यात आले आहे. या पार्कमुळे परिसरातील नागरिकांना फिरण्यासाठी अत्यंत चांगली सोय उपलब्ध झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परिसरात चोऱ्या तसेच अनेक गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे केल्या होत्या. याची तात्काळ दखल घेऊन आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी अर्बन स्ट्रीट पार्क परिसराची पाहणी करत महापालिका तसेच पोलीस प्रशासनाला सूचना देत नागरिकांच्या सुविधांमध्ये तडजोड न करण्याबाबत सांगितले.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर महानगरपालिकेने अर्बन स्ट्रीट पार्क मधील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने या ठिकाणी पूर्णवेळ सुरक्षारक्षक नियुक्त करावेत, उद्यानात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात लोखंडी बाकडे बसवावेत, येथील झाडांना नियमितपणे पाणी देऊन येथील झाडांची निगा राखावी अशा सूचना सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला केल्या.

तसेच रात्री होणारे गैरप्रकार आणि चोऱ्या थांबवण्यासाठी पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांना फोन करून केली. पोलीस प्रशासनाने यावर तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत अर्बन स्ट्रीट पार्क परिसरात कायमस्वरूपी क्यूआर कोड बसवून पोलिसांची रोजची गस्त निश्चित करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा, अजय पोन्नम, अक्षय अंजीखाने, ज्ञानेश्वर म्याकल, ऋषिकेश मेट्रे, भाजपा शहर चिटणीस नागेश सरगम, सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

अर्बन स्ट्रीट पार्क हे सोलापुरातील नागरिकांना फिरण्यासाठी उत्तम ठिकाण ठरावे असा प्रयत्न आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शासनाचा हेतू साध्य होण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
-- देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी - सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत पाटील....सोलापूर जि...
22/05/2026

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी - सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत पाटील....

सोलापूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीसाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणूकचा कार्यक्रम 18 मे 2026 रोजी जाहीर झालेला आहे. या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात निवडणूक कामकाजासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या आदेशान्वये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

निवडणुकीदरम्यान सर्व कामकाज पारदर्शक व सुरळीत पार पडावे यासाठी आवश्यक ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या जबाबदारीची सविस्तर माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत पाटील यांनी देऊन सर्व नोडल अधिकाऱ्यांनी परस्परात समन्वय ठेवून काटेकोरपणे कामे करावीत, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित विधान परिषद निवडणूक नोडल अधिकारी आढावा बैठकीत श्री. पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपयुक्त अश्विनी पाटील, समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विना पवार, जिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका योगेश डोके, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी रवी पवार, तहसीलदार दिनेश पारगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीदरम्यान मनुष्यबळ व्यवस्थापन, प्रशिक्षण, साहित्य, वाहतूक, सायबर सुरक्षा, SVEEP योजना, कायदा व सुव्यवस्था, आचारसंहिता पालन, खर्च निरीक्षण, मतपत्रिका व पोस्टल बॅलेट, माध्यम व्यवस्थापन, तक्रार निवारण, निरीक्षक समन्वय, दिव्यांग मतदार सुविधा, एएमएफ, स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्र, सीमा व्यवस्थापन, दारू नियंत्रण, अन्न व्यवस्थापन, वन विंडो प्रणाली, जिल्हा नियंत्रण केंद्र, सूक्ष्म निरीक्षक, सोशल मीडिया निरीक्षण व वैद्यकीय सुविधा अशा 28 क्षेत्रांसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, असे श्री. पाटील यांनी सांगून सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबदाऱ्याची माहिती दिली.

बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक          - निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटीलबकरी ईद सण शांत...
22/05/2026

बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक
- निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

बकरी ईद सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे...

सोलापूर, दिनांक 22 - बकरी ईद हा सण दि. २७ मे २०२६ रोजी साजरा होत असून दि. २७ ते दि. २९ मे २०२६ या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांची खरेदी-विक्री होणार आहे. यासाठी बाजार भरविण्यात येणार असून जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी म्हटले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बकरी ईद 2026 निमित्त महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा 1976 व महाराष्ट्र प्रार्य रक्षण सुधारणा कायदा 1995 च्या अमलबजावणीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत निवासी जिल्हाधिकारी श्री. पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुऱ्हाण, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. अनिल तांबे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अत्तिक मुलानी, महापालिकेचे मंडई नियंत्रण अधिकारी तपन डंके, पशुसंवर्धन चे डॉ. डी. ए. गिड्डे, सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी हबीब भाई नदाफ, हाजी कुरेशी, इस्माईल पठाण आदी उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले की सामाजिक संघटनेच्या
वतीने देण्यात आलेल्या सूचना तसेच पशुसंवर्धन विभाग व महापालिकेच्या वतीने बकरी ईद निमित्त केलेल्या तयारी प्रमाणे परस्परात समन्वय ठेवून ईद शांततेत पार पडेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील व सर्व मुस्लिम धर्मीय सामाजिक संघटनांनी प्रशासनालाही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जनावरांची अवैध कत्तल व अवैध वाहतूक रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस विभाग, पर्यावरण विभाग व पशुसंवर्धन विभाग यांनी समन्वय साधून कार्यवाही करावी. ईद सणाच्या काळात मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असून कायदा व स्वास्थ्य तपासणी बाबत राहणाऱ्या त्रुटीचे निराकरण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करणे गरजेचे आहे, असे श्री. पाटील यांनी सांगितले.

महापालिकेचे मंडई नियंत्रण अधिकारी श्री. डंके यांनी बकरी ईद निमित्त लहान मोठ्या जनावरांची कुर्बानी देण्यासाठी फॉरेस्ट मटन मार्केट येथे व्यवस्था करण्यात आली असून पाण्याचे टँकरही उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले.

जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर तांबे म्हणाले की, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) कायदा, १९९५ अंतर्गत गाय, वळू, बैल यांच्या कत्तलीस व वाहतुकीस बंदी आहे. जनावरांची वाहतूक करत असताना जनावरांची वाहतूक अधिनियम, २००१ मधील नियम क्र.१६ नुसार वाहतूक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. प्राणी छळ प्रतिबंधक कायदा, १९६० व वाहतूक अधिनियम १९७८ मधील नियम ४७ नुसार जनावरांची स्वास्थ्य तपासणी करून न्यायालयीन प्रेषण आवश्यक आहे. ईद सणाच्या वाहतूक करत असताना प्राणी छळ प्रतिबंधक कायदा, १९६० मधील वाहतूक नियमांमधील तसेच पशुसंवर्धन विभाग, पर्यावरण विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे सांगितले.

अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य श्री. बुऱ्हाण यांनी छोट्या बकऱ्यांना घरीच कुर्बानी देण्याची परवानगी प्रशासनाकडे मागितली. देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण शांततेत सण साजरा करण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच हसीफ भाई नदाफ यांनी सोलापूर महापालिकेने मोठ्या जनावर साठी पुढील काळात त्वरित आधुनिक कत्तलखाना निर्माण करण्याची मागणी केली. तसेच अन्य सदस्यांनी बकरी ईद सण शांततेत साजरा करण्यासाठी विविध सूचना मांडल्या.

“लाडकी बहीण योजनेला स्व. अजितदादांचे नाव द्या”; वर्ल्ड ऑफ वुमेन संस्थेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी......
21/05/2026

“लाडकी बहीण योजनेला स्व. अजितदादांचे नाव द्या”; वर्ल्ड ऑफ वुमेन संस्थेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी...

मुंबई : राज्यात लोकप्रिय ठरलेल्या “लाडकी बहीण योजने”ला स्व.अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी वर्ल्ड ऑफ वुमेन (WOW) संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.संस्थेच्या आध्यक्षा विद्या लोलगे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, जून २०२४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्व.अजितदादा पवार यांनी “लाडकी बहीण योजना” जाहीर करून तिची प्रभावी अंमलबजावणी केली.राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा मोठा लाभ झाला असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाची ठरली आहे.त्यामुळे या योजनेला “स्व.अजितदादा पवार लाडकी बहीण योजना” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी महिलांच्या विविध प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. विधवा, घटस्फोटित आणि एकल महिलांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत अत्यल्प असल्याचे सांगत, ती किमान तीन हजार रुपये करण्यात यावी, अशी मागणीही संस्थेच्या वतीने करण्यात आली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांनी महिलांच्या समस्या आणि मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत, शासनस्तरावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या भेटीत संस्थेच्या अध्यक्षा विद्याताई लोलगे यांच्यासह सरस्वती शेडगे, कांचन गोगले, लक्ष्मी माने, शोभा गायकवाड, पूजा हलकुंडे, स्वाती मुकणार, ममता आराडे, शबाना शेख, शारदा मराठे, प्रिया कुलकर्णी आदी महिला उपस्थित होत्या.

मनसेचा सोलापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन; असंख्य महिलांचा पक्षप्रवेश, आगामी निवडणुका जोमाने लढणार – ॲड. किशोर शिंदे...सोलाप...
20/05/2026

मनसेचा सोलापुरात जोरदार शक्तीप्रदर्शन; असंख्य महिलांचा पक्षप्रवेश, आगामी निवडणुका जोमाने लढणार – ॲड. किशोर शिंदे...

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नूतन संपर्क अध्यक्ष ॲड. किशोर शिंदे आणि ॲड. सुधीर पाटसकर यांनी सोलापूर दौऱ्यावर येत पक्ष संघटन बांधणीला वेग देण्याचा निर्धार व्यक्त केला. उत्तर सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ मतदारसंघातील पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या या नेत्यांच्या उपस्थितीत सोन्या मारुती चौकातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात महिलांचा मोठ्या संख्येने पक्षप्रवेश झाला.

सौ. सोनाली भागानगरे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत मनसेला पाठिंबा दर्शविला. यावेळी बोलताना संपर्क अध्यक्ष ॲड. किशोर शिंदे यांनी, “सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मनसेची ताकद अधिक वाढविणार असून आगामी काळातील सर्व निवडणुका पक्ष पूर्ण ताकदीने लढविणार आहे,” असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, जिल्हा वाहतूक संघटक प्रसाद कुमठेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माने, जिल्हा सचिव रोहित कलशेट्टी, तालुका अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, कामगार सेना शहराध्यक्ष श्रीधर गुड्डेली, महिला आघाडी शहराध्यक्ष जयश्रीताई हिरेमठ, रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे यांच्यासह करुणा यादव, सागर जिडगी, ओंकार सोंडेकर, अनिकेत उपासे, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, इरेश करजगी आणि मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित... सोलापूर : बालाजी अमाईन्सने चिंचोळी एमआयडीसी, सोला...
20/05/2026

भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित...


सोलापूर : बालाजी अमाईन्सने चिंचोळी एमआयडीसी, सोलापूर येथील आपल्या युनिट-४ प्रकल्पामध्ये डायमिथाईल इथर (DME) उत्पादन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केला असून दिनांक २० मे २०२६ पासून व्यावसायिक उत्पादनास प्रारंभ करण्यात आला आहे. या यशामुळे व्यावसायिक स्तरावर डीएमईचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी ठरली आहे.

डीएमई हे एलपीजीमध्ये मिश्रण करून वापरता येणारे स्वच्छ व कार्यक्षम पर्यायी इंधन मानले जाते. अनेक पाश्चिमात्य व युरोपीय देशांमध्ये एलपीजीमध्ये २० टक्क्यांपर्यंत डीएमईचे मिश्रण करून त्याचा वापर केला जातो. कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दरवर्षी १,००,००० मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प उभारला असून डीएमईसाठी आवश्यक मूलभूत अभियांत्रिकी तंत्रज्ञान परदेशी कंपनीकडून प्राप्त करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले की, हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतासाठी डीएमई उत्पादन पूर्णपणे नवीन असल्याने बीआयएसने (BIS) नुकताच नवीन आयएस कोड प्रसिद्ध केला असून त्यानुसार एलपीजीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत डीएमई मिश्रण करू शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) आता डीएमई मिश्रण उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

जागतिक ऊर्जा क्षेत्रातील वाढती अनिश्चितता लक्षात घेता पर्यायी इंधनांचा विकास ही काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. डीएमईच्या वापरामुळे भारताची एलपीजी आयातीवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होऊन परकीय चलनाची बचत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतामधील हा पहिलाच डीएमई उत्पादन प्रकल्प असल्यामुळे उत्पादन साठवण, हाताळणी, वापर, वाहतूक तसेच रोड टँकरद्वारे परिवहन यांसंदर्भातील पुरेशा भारतीय मानकांच्या अभावामुळे PESO परवानग्या व इतर वैधानिक मंजुरी मिळविताना कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय मानकांचा संदर्भ घेऊन त्यांचे परीक्षण व पडताळणी करत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी बालाजी अमाईन्स एरोसोल उद्योग तसेच इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये हीटिंगसाठी इंधन म्हणून डीएमईचा पुरवठा करणार आहे.

या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभास पूर्णवेळ संचालक एन. राजेश्वर रेड्डी, वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री. गोविंद मेंचेकरे तसेच महाव्यवस्थापक श्री. विनय दुर्गम उपस्थित होते.

यावेळी डी. राम रेड्डी यांनी कंपनीच्या भविष्यातील धोरणाबाबत माहिती देताना सांगितले की, बालाजी अमाईन्स भारतातील ईव्ही बॅटरी केमिकल्स क्षेत्रात अग्रगण्य भूमिका बजावण्यासाठी वेगाने विस्तार करत आहे. ईव्ही बॅटरी क्षेत्रातील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनीने लक्ष केंद्रित केले असून भविष्यात विद्यमान काही प्रकल्पांचे पुनर्रचना करून नव्या पिढीतील ईव्ही बॅटरी केमिकल्स उत्पादनासाठी त्यांचा वापर केला जाणार आहे.

डायमिथाईल कार्बोनेट (DMC) – इलेक्ट्रॉनिक ग्रेड :

डीएमसीचा वापर ईव्ही बॅटरी इलेक्ट्रोलाइट्समध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतात या रसायनाचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही एकमेव कंपनी असून कंपनीकडे सध्या वार्षिक १५,००० मे. टन उत्पादन क्षमता उपलब्ध आहे. अत्यल्प अतिरिक्त खर्चात ही क्षमता वाढविण्याची क्षमता कंपनीकडे आहे.

एन-मिथाईल पायरोलिडोन (NMP) – इलेक्ट्रॉनिक ग्रेड :

एनएमपीचे उत्पादन बालाजी अमाईन्स गेल्या दोन दशकांपासून करत असून आता कंपनीने ईव्ही बॅटरी ग्रेड सॉल्व्हेंट विकसित केले आहेत. देशभर उभारल्या जाणाऱ्या गिगा वॅट क्षमतेच्या ईव्ही बॅटरी प्रकल्पांना पुरवठा करण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे.

डीएमसी व एनएमपी या दोन्ही रसायनांचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी आहे. या सर्व घडामोडींमुळे विशेष रसायन क्षेत्रातील विविध विभागांमध्ये कंपनी अग्रस्थानी असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक काँग्रेसने लढवावी – काकासाहेब कुलकर्णी यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी...
20/05/2026

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक काँग्रेसने लढवावी – काकासाहेब कुलकर्णी यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी...

सोलापूर : आगामी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवार देऊन निवडणूक लढवावी, अशी ठाम मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

काकासाहेब कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षीय ताकद लक्षात घेता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला प्राधान्य दिले पाहिजे. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद, जनाधार आणि कार्यकर्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात असून अनेक वर्षांपासून काँग्रेस विचाराचे कार्यकर्ते तळागाळात सक्रियपणे काम करत आहेत.

मागील विधान परिषद निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीत नवीन रणनीतीची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. जुन्या राजकीय समीकरणांपेक्षा स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची ताकद, जनाधार आणि पक्ष संघटन यावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक मुळे अधिक व्यापक पातळीवर रुजलेली असल्याचा दावा व महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष हा मोठा भाऊ असल्याचेही काकासाहेब कुलकर्णी म्हणाले आहेत . जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसशी संबंधित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक सक्रिय आहेत.

महाविकास आघाडीच्या दृष्टीनेही सोलापूरची ही जागा महत्त्वाची असून, आघाडी अधिक बळकट करण्यासाठी काँग्रेसला संधी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाचा विचार सामान्य जनता, शेतकरी, युवक, कामगार आणि वंचित घटकांमध्ये आजही प्रभावी असून या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार दिल्यास कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेवटी, पक्षश्रेष्ठींनी सोलापूरच्या स्थानिक राजकीय वास्तवाचा विचार करून महाविकास आघाडीत काँग्रेसला ही जागा द्यावी आणि पक्षाच्या उमेदवाराला संधी द्यावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

19/05/2026

मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा एसटीने प्रवास… Livesolapur News ABP Majha BBC News Marathi Mumbai Tak Saam TV News TV9 Marathi Zee Marathi Saamana Online fans

18/05/2026

महापालिका भंगार प्रकरण : अमोल शिंदे यांनी विचारताच ते कर्मचारी पळाले Livesolapur News ABP Majha BBC News Marathi Mumbai Tak Saam TV News TV9 Marathi Zee Marathi fans Saamana Online

Address

Solapur
413001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Livesolapur News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Livesolapur News:

Share