01/10/2024
शिक्षणाचा फार्स काही केल्या संपेना
नेहमी आपल्या लेखाला आपण मराठी साहित्यातील आनंदयात्री म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या पु.लं. देशपांडे यांच्या साहित्यातील एका प्रसंगावरून करतो. आज तसाच एक मजेदार प्रसंग. प्रसंग आहे असा मी असामी मधला. धोंडोपंतांचा मुलगा शंकऱ्या आपल्या शाळेतलं प्रगती पुस्तक आणून त्यांच्या समोर अतिशय कोडगेपणाने सही करून द्या ना, असं म्हणत उभा आहे आणि त्याच्यावर धड वैतागताही न येणारे धोंडोपंत हताशपणे त्याच्या शाळेच्या पुस्तकातील संत तुकारामांच्या अभंगावरचा धडा वाचत आहेत. जबरदस्त प्रसंग आहे तो. त्या अभंगाखाली स्वाध्याय म्हणून दिलेले सर्व आपण वाचले तर धोंडोपंतांसारखीच आपल्याला पण घेरी येते. पण यातून एक गोष्ट मात्र अगदीच उफाळून आल्यासारखी मनात येते की आपल्या सर्वांच्याच आयुष्यात हा प्रसंग एकदातरी येतोच येतो. त्यामुळे आपण खळखळून हसतो, पण नीट बघायला गेलं तर खरा प्रश्न तसाच राहिला आहे. त्यावर उत्तर अजून निघालंच नाही किंवा कोणी विचारच केला नाही. एक चांगलं उच्च शिक्षण घेऊन, नोकरी किंवा व्यवसायात स्थिर होण्याची स्वप्न उराशी बाळगून असलेला मध्यमवर्ग मात्र या शिक्षण व्यवस्थेच्या गोंधळात ससेहोलपट भोगत आहे. कोणीच यावर पुढे होऊन विचार करत नाही. अति श्रीमंत वर्गाला या प्रश्नाची काळजी करण्याची गरजच भासत नाही, कारण सर्वच सुख त्यांच्या समोर हात जोडून उभी असतात आणि अति गरीब लोकांना रोजच्या तोंडमिळवणीची चिंता त्यामुळे राहता राहिला तो मध्यमवर्ग आणि तोच शिक्षण व्यवस्था या प्रश्नाच्या केंद्रस्थानी येतो आणि सगळ्या गोष्टींची धग सहन करत राहतो. आज आरोग्य व्यवस्थेसारख्याच अतिशय दुर्लक्षित विषयाची चर्चा. शिक्षण व्यवस्थेची, त्याच्या प्रश्नांचा, उत्तरांचा उहापोह करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न.
भारतात शिक्षण व्यवस्था ही आरोग्यसेवे सारखीच अत्यंत दुर्लक्षित अशीच गोष्ट. अगदी बालवाडी पासूनच आपल्याकडे सर्व गोंधळाला सुरुवात होते. मुळात शिक्षण ही अत्यंत मूलभूत गरज. मुळात शिक्षण भविष्यात वेगवेगळी प्रगतीची शिखरे साध्य करण्यासाठी घ्यायचं असतं, पण इथे मात्र ते अनेक खासगी संस्थांच्या कमाईचे राखीव कुरण बनले आहे. आज बालवाडी पासूनच लाखांच्या घरात फी सुरु होतात. ते एवढे मोठाले आकडे ऐकले की आपलं संपूर्ण शिक्षण सुद्धा याच्या पेक्षा कमी पैश्यांमध्ये झालं हे झटकन लक्षात येतं. हा गोंधळ इथेच संपत नाही, इथून तर सुरुवात होते. शाळेच्या शिक्षणावर भागत नाही म्हणून मोठाल्या फी भरून ज्यादा क्लासेस लावावे लागतात. परत फक्त शाळेतलं शिक्षण घेऊन भागात नाही, मुलांच्या अंगात विविध कलागुण विकसित व्हावेत म्हणून त्यांना विविध स्पर्धांना घालावं लागतं. त्यांचा परत वेगळा खर्च. हे बालवाडी ते दहावी चालूच राहतं. त्यातून एवढं करून भागत नाही म्हणून मग पुढचे कॉलेजचे टेन्शन, मग करियर काय करणार याचं टेन्शन या सर्वच गोष्टी येतात. यात फक्त मध्यमवर्गाच भरडला जातोय का? सगळेच या चरख्यातून जात आहेत. पण उच्च उत्पन्न गटाला हे करताना सर्व संसाधने उपलब्ध असतात त्यामुळे ते सोपे जाते आणि गरीब वर्ग तर इथपर्यंत पोहोचूच शकत नाही म्हणून लांब राहतो. मग उरतो तो मध्यमवर्ग तो मात्र या सर्व पिळवणुकीतून पिळला जातो खूप. त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे बघणं महत्वाचे ठरते.
आपल्याकडे कायमच बोंब होत असते की आपल्याकडच्या शिक्षणाचा आणि व्यवहारातील जगाचा काहीच संबंध नाही. त्यामुळे मुळातच आपण काय शिकलो म्हणजे आपल्याला चांगली नोकरी किंवा व्यवसाय करता येईल याची नीट माहितीच मिळत नाही. इंजिनीअरिंग, आयटी यांच्या सारख्या क्षेत्रांत गलेलठ्ठ पगाराच्या, परदेशी जायच्या संधी मिळतात म्हणून त्यांच्याकडे सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीयांचा प्रचंड ओढा असतो, पण त्यातून ही अशी संधी किती जणांना मिळणार? जेवढे लोक दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडतात त्यांचं नक्की काय होतं ? याचा किती अभ्यास झाला आहे? आज मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये, त्यांच्या आजूबाजूच्या उपनगरांमध्ये शेकड्याने कॉलेज आहेत पण त्यातली हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच कॉलेजेस आहेत ज्यातील मुलांना या संधी मिळतात, बाकीच्यांचं नक्की काय होतं याची माहितीच कोणाला नसते. ही आज जवळपास सर्वच शाखांची स्थिती आहे. मुंबई- पुण्याकडे अशी अवस्था आहे तर बाकीच्या ठिकाणी काय होतंय याची कल्पनाच केलेली बरी. कोणालाच याबद्दल फरक पडत नाही आणि सरकार पातळीवरही याबद्दल आश्चर्यकारक उदासीनता आहे.
एकंदरीतच शिक्षण या बाबतीत प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे, पूर्वी कधीकाळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात मोठी जगप्रसिद्ध विद्यापीठे होती. तिकडे शिकायला परदेशातून सुद्धा लोक येत होते. पण आज त्याच भारतातील शिक्षण क्षेत्राची अवस्था फारच बिकट होत चालली आहे. नक्की यावर उत्तर शोधायचं कसं हा प्रश्नच आहे पण प्रयत्न जरूर करू पुढील भागात यावरील उत्तरांची चर्चा.
तूर्तास इतकंच पुरे.....